कोणताही कलाकार जसा स्वरांचा,तालाचा रियाज करतो तसेच निवेदकालाही शब्दांचा सातत्याने रियाज करावा लागतो,असे मत मैत्रेय आयोजित शब्दमैफल पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध निवेदिका सौ.सुकन्या जोशी यांनी व्यक्त केले.
स्व.श्री.सतीश दिवाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ निवेदनाच्या क्षेत्रात उत्तम निवेदन करणाऱ्या निवेदकाला दरवर्षी हा शब्दमैफल पुरस्कार देण्यात येतो.
प्रसिद्ध उद्योजक श्री. संतोष गुजराथी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.याप्रसंगी एक सहृदयी मित्र म्हणून स्व.श्री.सतीश दिवाण यांच्या आठवणींना श्री.संतोष गुजराथी यांनी उजाळा दिला.आपल्या निवेदक मित्राच्या आठवणींचा सलग अकरा वर्ष सुरू असलेला हा पुरस्काररुपी अनोखा उत्सव असाच वृद्धिंगत होत रहावा अशा शुभेच्छा त्यांनी याप्रसंगी दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवात सौ मंजुश्री दिवाण वेल्हणकर यांच्या जय शारदे वागेश्वरी या सुश्राव्य गीत गायनाने झाली.तसेच ऋतुजा केचं, सई ठकार, सुराज सोमण यांनी सादर केलेल्या बहारदार अभंग,
भावगीतांना उपस्थित रसिकांनी अतिशय सुरेख दाद दिली.त्यांना श्री.उमेश पुरोहित (हार्मोनियम), श्री.चेतन ताम्हणकर (तबला)व श्री.निषाद शिधये (तालवाद्य) यांची उत्तम साथसंगत लाभली. या गीत गायन कार्यक्रमात सौ सुकन्या जोशी यांनी केलेल्या उत्स्फूर्त व सुंदर निवेदनामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.
कार्यक्रमाचे आयोजन श्री संजय गोसावी,सौ मंजुश्री दिवाण वेल्हणकर,अद्वैत दिवाण,अथर्व वेल्हणकर यांनी केले.श्री चारुदत्त देशपांडे व सौ.कीर्ती मराठी यांनी संयोजन केले.याप्रसंगी देण्यात आलेल्या शब्दमैफल मानपत्राचे शब्दांकन,
वाचन सौ.विशाखा कुलकर्णी व मानपत्राचे अक्षरलेखन कु.नीरज कुलकर्णी याने केले होते