पर्यावरण प्रेमी संघटना सरसावल्या.
रावेत येथील मेट्रो इको पार्कच्या जागेत निवडणूक आयोगाने त्यांच्या नव्या इमारती साठी खोदकाम सुरू केले असल्याने शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या इको पार्कच्या संरक्षणा साठी पर्यावरणप्रेमी संघटना आता सरसावल्या आहेत.
२०१६ साली प्राधिकरण सेक्टर २९ मधील या मेट्रो पार्कच्या विकासाला मान्यता दिली होती.या पार्कच्या ५ एकर क्षेत्रात अनेक दुर्मिळ देशी व औषधी झाडे लावली आहेत. या पर्यावरणपूरक झाडांचे संवर्धन इथे फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून नेहमी केले जाते.वाढत्या शहरीकरणात मोकळ्या आणि शुद्ध हवेची गरज असताना अशा उद्यानाचा बळी जाऊ नये अशी भूमिका रावेत येथील नागरिकांनी घेतली आहे.
मेट्रो पार्कची ही झाडे वाचविण्यासाठी नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांची भेटही होऊ शकत नसल्याने रावेत येथील नागरिक अस्वस्थ आहेत.तरीही या झाडांची अनेक वर्षे सुरू असलेली नियमित सेवा यापुढेही अशीच सुरू ठेवणार असल्याची भूमिका रावेत नागरिकांनी घेतली आहे.
फोटोग्राफी:पराग गोहिल