स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून राहुल गांधींच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अवमानकारक वक्तव्य केले आहे.ब्रिटनमध्ये केलेल्या एका भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याने सावरकर प्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे येथील शिवाजी नगर न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात बुधवार, १२ एप्रिल रोजी फौजदारी मानहानीचा दावा दाखल केला आहे.
ब्रिटनमध्ये त्यांनी जे भाषण झाले त्यात असे वक्तव्य केले की, एका मुस्लिम व्यक्तीला सावरकरांचे ५ते ६ सहकारी मारहाण करत असताना ते दृश्य पाहून सावरकरांना आनंद होत होता, असे सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. जर ५ते ६ माणसे एका माणसाला मारत असतील, तर ती कायरता होते, जर लढायचे असेल तर एका बरोबर एकाने लढावे, असे राहुल गांधी त्यावेळी म्हणाले आहेत.राहुल गांधी यांनी सांगितलेला प्रसंग खोटा आणि कपोलकल्पित आहे. वीर सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात अशा प्रकारचा कोणताही प्रसंग लिहिलेला नाही. त्यामुळे वीर सावरकर यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी राहुल गांधी यांनी वरील विधान केले.
वीर सावरकर यांनी हे विधान कोणत्या पुस्तकात लिहिले आहे, हे त्यांनी पुराव्यासह सिद्ध करावे अन्यथा त्यांच्यावर भा.दं.वि. कलम ४९९ आणि ५०० नुसार त्यांना शिक्षा देण्यात यावी,अशी मागणी न्यायालयाला केली आहे. १५ एप्रिल रोजी न्यायालयाने आम्हाला बोलावले आहे, असे सात्यकी सावरकर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला सांगितले.