फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय मेट्रो मार्गाचे काम सुपर वेगात सुरू,एप्रिल अखेरीस सर्व कामे पूर्ण होतील.
गेल्या कित्येक दिवसां पासून सुरू असलेली पुणे आणि पिंपरी चिंचवड मेट्रो मार्गाची कामे आता एप्रिल महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार असून,लवकरच या मार्गावर मेट्रो सेवा सुरू होणार आहे.शहरातील वाहतुकीचा वाढता ताण कमी करण्याच्या दृष्टीने मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले.पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही शहरे मेट्रोने जोडली जाणार आहेत. फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय या मार्गावर लवकरच सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, गरवारे महाविद्यालय हा मेट्रो मार्गही त्याचवेळी सुरू होईल,अशी माहिती मेट्रोतील सूत्रांनी दिली.
गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल आणि फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय या मेट्रो मार्गाची कामे महामेट्रोकडून वेगाने सुरू आहेत. दोन्ही मार्गावरील स्थानकांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक (१७ किलोमीटर) आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक (१६ किलोमीटर) असे ३३ किमी लांबीचे दोन मार्ग आहेत. एप्रिलअखेरीस ही सर्व कामे पूर्ण करण्याचे मेट्रोचे नियोजन असून काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्त तपासणी करतील व अंतिम मंजुरी देतील. यानंतर राज्य सरकार या मार्गांवरील सेवा सुरू करण्याचा निर्णय घेईल असे महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी श्री हेमंत सोनावणे यांनी सांगितले.