पिंपरी चिंचवडमधे घरगुती गॅसचा काळाबाजार
पिंपरी घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या.घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये धोकादायक पद्धतीने गॅस भरण्यात येत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे
या प्रकरणी परमेश्वर दयानंद माने (वय २६, रा. धावडेवस्ती, भोसरी, मूळ रा. आंबेगाव, ता. देवणी, जि. लातूर) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीकडून ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांना मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी परिसरात लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा पध्दतीने घरगुती गॅसचा काळाबाजार करत असल्याचे आढळून आले.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने भगतवस्ती, साधना कॉम्पलेक्स, भोसरी येथील लक्ष्मी गॅस इंटरप्रायजेस दुकानामध्ये पडताळणी केली. त्यावेळी आरोपी हा घरगुती गॅसच्या मोठ्या टाकीमधील गॅस लहान टाक्यांमध्ये भरून विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार ही कारवाई करून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून घरगुती वापराच्या गॅसच्या १० मोठ्या टाक्या, गॅसच्या २८ लहान टाक्या अशा एकूण ३८ गॅस टाक्या, दोन गॅस विड्रॉल मशीन, एक वजनकाटा असा एकुण ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या गॅस टाक्या चढ्या दराने विक्री करताना आरोपी आढळून आला. त्यानुसार आरोपीच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासासाठी आरोपीला भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक इम्रान शेख, पोलिस कर्मचारी फारुक मुल्ला, प्रमोद हिरळकर, विशाल भोईर, मारुती जायभाय, स्वप्नील महाले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.