संभाजी नगर चिंचवड येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय सहा वर्षांपासून बंद, नूतनीकरणावर मोठा खर्च
चिंचवड: महापालिकेचे संभाजीनगर चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय नूतनीकरणासाठी मागील सहा वर्षांपासून पर्यटकांकरिता बंद आहे. नूतनीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. आतापर्यंत २० कोटींहून अधिक खर्च झाला असताना आणखी १४ कोटी रुपयांची निविदा महापालिकेने प्रसिद्ध केली. प्राणिसंग्रहालय बंद असल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ते कधी खुले होणार याची पर्यटक आतुरतेने वाट पाहत आहेत.
प्राण्यांसाठी अद्ययावत रुग्णालय, प्राणिसंग्रहालयाच्या मध्यभागी माहिती केंद्र, वन्यजीवविषयक ग्रंथालय, लहान मुलांना वन्यजीव संकल्पना समजावी अशा खेळांचे नियोजन करणे अशा विविध सुधारणा केल्या जात आहेत. पण, काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. येत्या काही महिन्यांत प्राणिसंग्रहालयाचे काम पूर्ण करून ते नागरिकांसाठी खुले होईल, असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात होता. असे सांगितले जात असताना, प्राणिसंग्रहालय सुशोभीकरणाच्या नावाखाली आणखी १३ कोटी ९९ लाख चार हजार ७३९ रुपयांची निविदा महापालिकेने प्रसिद्ध केली आहे.सद्य:स्थितीत पक्षी, कासव, मोर, मगर, साप असे विविध १८७ प्राणी आहेत.
केवळ सुशोभीकरणाची नाही, तर स्थापत्यविषयक कामेदेखील या निविदेत आहेत. संग्रहालयाचे काम लवकर पूर्ण करून सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.