शहर सौंदर्याचा पिंपरी चिंचवड महापालिकेला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार
दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेला यावर्षी शहर सौंदर्य
करण्यासाठीच्या पुरस्काराने सन्मानित केले आहे. महापालिकेने तृतीय क्रमांक मिळवून ५ कोटी रुपयाचे बक्षीस मिळाले आहे.गेल्या वर्षी महापालिकेला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता.
शहर सौंदर्यीकरण व नागरी प्रशासनातील विविध बाबींमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना नगरविकास दिनानिमित्त राज्य सरकारमार्फत गौरविण्यात आले. मुंबईत गुरुवारी हा कार्यक्रम झाला.महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे पारितोषिक स्वीकारले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी शेखर सिंह यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, मनोज सेठिया, उपआयुक्त रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर आणि प्रशासन अधिकारी तथा स्वच्छ सर्वेक्षण समन्वयक सोनम देशमुख उपस्थित राहिले होते.पाच कोटी रुपये रोख आणि प्रशस्तिपत्र असे स्वरूप आहे.त्यावेळी बोलताना आयुक्त म्हणाले, प्रशासकीय गतिमानता, दर्जेदार विकासकामे आणि उपक्रम राबविण्या कडे महापालिकेने भर दिला असून,हा शहरातील नागरिकांचा सन्मान आहे.नागरिकांच्या गरजा आणि भविष्यात करायच्या आवश्यक सेवासुविधांचा सर्वंकष विचार करून महापालिका विविध विकास प्रकल्प, उपक्रम आणि योजना राबवीत आहे. यात लोकप्रतिनिधी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे. सामूहिक प्रयत्न आणि नागरी सहभागा मुळे शहराला जागतिक दर्जाचे शहर बनवणे सहज शक्य आहे.