“अनफिट” वाहनांना प्रवेश नाकारला,समृद्धी महामार्गाच्या अतिवेगावर आता करडी नजर.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गाच्या 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन करण्यात आले होते. मात्र अवघ्या 100 दिवसांतच समृद्धी मागमार्गावर तब्बल 900 अपघात झाल्याची माहिती समोर आल्याने सुरक्षा अधिकारी वाहतूक पोलिसांनी सावध होऊन कडक उपाययोजना सुरु केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ह्या महामार्गावर वारंवार असे अपघात घडतात याबाबत चिंता व्यक्त होत आहे. त्यासाठी आता अधिकाऱ्यांकडून वाहनांवर व त्यांच्या वेगांवर पाळत ठेवली जात आहे. या महामार्गावरून प्रवेश करताना गाड्यांचा अतिवेग रोखण्यासाठी वाहनांच्या प्रवेशाची वेळ आणि बाहेर पडण्याची वेळेची नोंद अधिकाऱ्यां कडून ठेवली जात आहे. त्यानंतर ते गाड्यांच्या ऍव्हरेज वेगाचे विश्लेषण करत असून परवानगी असलेल्या वेग मर्यादेपेक्षा (120 किमी प्रतितास) जास्त वेगाने गाडी चालवल्यास बाहेर पडण्याचे गेट आपोआप लॉक होईल आणि सायरन वाजवला जाईल, असे अधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले.
विदर्भाला खऱ्या अर्थाने या नागपूर-मुंबई समृद्धी एक्सप्रेसवेमुळे नवी संजीवनी मिळाली आहे. एकूण 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातून जात आहे. नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास 16 तासांवरून आठ तासांने कमी होईल. 55335 कोटी रुपयांच्या या एकूण प्रकल्पात 5 उड्डाणपूल, 33 मोठे पूल, 274 छोटे पूल, 8 रेल्वे ओव्हर ब्रिज, 25 इंटरचेंज, 6 बोगदे,189 अंडरपास, हलक्या वाहनांसाठी 110 अंडरपास, 209 अंडरपास आणि 8 पशूंसाठी 209 अंडरपास यांचा समावेश आहे.
या महामार्गावरील सुरक्षा अधिकारी वाहतूक पोलिसांनी ज्या टायरची झीज झाली आहे अशा वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवेश नाकारण्यात येण्याचे सांगितले आहे.