ओला,उबेर रिक्षा होणार बंद.. पुणेकरांसाठी चिंतेची बातमी
घरात बसून आपल्याला हवे त्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या Ola,Uber च्या रिक्षा बुक करण्याचे प्रमाण वाढले होते परंतु आता ओला, उबेर रिक्षाने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी एक चिंता करणारी बातमी आहे कारण पुण्यातील ओला, उबेर रिक्षा येत्या काही दिवसात बंद होणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत या संबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुण्यात ओला, उबेरकडून दिली जाणारी प्रवासी रिक्षा सेवा बंद करावी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे सूर आहेत.
‘मोटार वाहन समुच्चयक मार्गदर्शक सूचना- 2020’ नुसार आवश्यक बाबींची पूर्तता होत नसल्याने मे. ॲनी टेक्नॉलॉजी प्रा. लि. पुणे, मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि., मे. किव्होल्युशन टेक्नॉलॉजीज प्रा.लि. पुणे आणि मे. रोपन ट्रान्सपोर्ट्रेशन सर्व्हिस प्रा.लि. पुणे या चार कंपन्यांना तीनचाकी रिक्षांचे ॲग्रीगेटर लायसन्स पुणे आरटीओने नाकारले आहे.
चारही कंपन्यांचे ऑटो रिक्षा संवर्गात ॲग्रीगेटर लायसन्स नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर मे. ॲनी टेक्नॉलॉजीज प्रा.लि. व मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि. यांना चारचाकी हलकी मोटार वाहने संवर्गाकरीता ॲग्रीगेटर लायसन्स जारी करण्या बाबत शासनाकडून मार्गदर्शन घेण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतलाआहे,
अशीही माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली आहे.