सुस,म्हाळुंगे,बावधन पाणी प्रश्न ‘ तापला ‘,येथील सोसायट्यांना मागवावे लागते दररोज किमान पाच टँकर पाणी
उन्हाची वाढती तीव्रता आणि पाण्याची वाढलेली मागणी यामुळे सध्या सुस,म्हाळुंगे,बावधन येथील सोसायट्यांचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुस मधील एका सोसायटीला दररोज किमान पाच टँकर पाण्याची मागणी करावी लागते. या परिसरातील अनेक सोसायटी यांना पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागत आहे. गेल्या काही वर्षात येथे मोठ्या प्रमाणावर सोसायटी तयार झाल्या आहेत
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या सर्व सोसायट्यांना मंजुरी देण्यात आली असली तरी त्यांच्या पिण्याच्या पाण्याची तरतूद, सांडपाणी,
मैला शुद्धीकरण प्रकल्प, या आवश्यक गरजांची कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. मागील काही वर्षापासून येथील सोसायट्यांना बोरवेल आणि टँकरचे पाणी यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
सुस,म्हाळुंगे,बावधन ही गावे महापालिकेच्या हद्दीत आल्याने येथील पाणी प्रश्न सुटेल अशी नागरिकांच्या अपेक्षा होती परंतु अजून कोणताही प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत नसली तरी महापालिकेकडून समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या टाक्या बसवण्याचे काम सुरू केले आहे. परंतु या सर्व कामाला अजून किमान दोन वर्ष वाट पाहावी लागणार असल्याने या गावातील सोसायटी यांना अजूनही काही दिवस पाणी प्रश्नाला तोंड द्यावे लागेल. याविषयी महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले की सुस,म्हाळुंगे च्या पाण्याच्या कामासाठी ची 52 कोटीची निविदा काढली आहे, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनी व पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण होइल.