अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश.. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची ३७ होर्डिंगवर कारवाई.
मागील आठवड्यात १७ एप्रिल रोजी झालेल्या जोरदार पावसाच्या तडाख्यात किवळे येथील अनधिकृत फलक पडून पाच जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले होते. महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाने याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर अनधिकृत व अधिकृत फलकांच्या स्ट्रक्चरल ऑडिट, राज्य सरकारचे जाहिरात धोरणाची अंमलबजावणी करण्यासह अनधिकृत होर्डिंग काढण्याची कारवाई महापालिका प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली आहे.
यामधे शहरात ५०५ अनधिकृत होर्डिंग आढळले असून त्यातील ४३३होर्डिंगचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत. उर्वरित ७२ पैकी ३७ आतापर्यंत काढले असून उर्वरित ३५ होर्डिंग येत्या दोन दिवसांत काढण्यात येणार आहेत,अशी माहिती आकाशचिन्ह परवाना विभागाने दिली आहे.
न्यायालयात प्रलंबित याचिकेच्या अधिन राहून अनधिकृत व अधिकृत फलकधारकांना परवाना प्राप्त संरचना अभियंत्याचे संरचना मजबुतीचे (स्थिरतेचे) प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. मंजूर आकारापेक्षा मोठे होर्डिंग त्वरीत काढून घ्यावेत. अन्यथा कारवाई करून गुन्ह दाखल केले जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. काढलेले ३७ होर्डिंग मुंबई- बंगळूर महामार्ग, पुनावळे,पुनावळे रोड, ताथवडे,हिंजवडी,वाकड रोड, कासारवाडी,देहू-मोशी रोड, दिघी, इंद्रायणीनगर, भोसरी एमआडीसी, विनोदे वस्ती, मारुंजी, कस्पटे वस्ती, लोंढे वस्ती, किवळे आदी भागातील आहेत. न्यायप्रविष्ट प्रकरणातील होर्डिंग व्यतिरिक्त शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग तत्काळ काढून टाकण्याचा आदेश आकाशचिन्ह व परवाना विभागाला दिला आहे. त्यानुसार कारवाई सुरू आहे. किवळे येथील घडलेली दुर्घटना उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर योग्य कार्यवाही करण्यात येईल. मात्र न्यायप्रविष्ट होर्डिंग्ज धारक यांनी स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. असे शेखर सिंह, प्रशासक, महापालिका आयुक्तांनी सांगितले