पिंपळगाव टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यां विरोधात तक्रार,पुरुष आणि महिला कर्मचारी यांची दादागिरी.
गेल्या दोन वर्षांपासून नाशिक पुणे महामार्गा वरील पिंपळगाव बसवंत टोल नाका बेशिस्त वागणुकीसाठी व गैरप्रकरणांसाठी चर्चेत आहे.पिंपरी चिंचवड व पुणे शहरातून शेकडो रहिवाशी वाहनचालक ह्या नाक्यावरून प्रवास करत असतात.परंतु नाक्यावर कार्यरत असणारे कर्मचारी हे वाहन चालकां सोबत अतिशय उद्धटपणे वागत आहेत, अश्या अनेक तक्रारी वेळोवेळी समितीकडे प्राप्त झाल्या होत्या. टोल घेताना सौजन्याने वागावे असा साधा नियम सुद्धा ते पालन करत नसल्याचे अनेक वाहनचालकांना दिसून आले होते.
तक्रारींमध्ये वाढ झाल्यामुळे पिंपळगाव टोल नाक्यावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याचे नियोजन करण्यात आले. त्या समितीच्या पाहणी दौऱ्यात टोल नाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांची दादागिरीची भाषा आणि असभ्य वर्तनाचे प्रत्यक्ष दर्शन आढळल्याने समितीच्या वतीने पिंपळगाव पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली गेली. या पाहणी दरम्यान समितीचे विभागीय अध्यक्ष संतोष चव्हाण सुद्धा उपस्थित होते. पाहणी दरम्यान अनेक टोल नियमांचे पालन टोल व्यवस्थापन करत नसल्याचे दिसून आले.
या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छताही दिसून आली.महिला कर्मचाऱ्यांनी कामावर हजर असताना तंबाखूचे सेवन केल्याचेही दिसून आले. या तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्ष टोलस्थळी जाऊन पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी उलटतपासणी व पाहणी केली.त्यामध्ये त्यांनां तथ्य आढळुन आले. समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या तक्रार अर्जानुसार सदरच्या पिंपळगाव टोल नाक्यावर जाऊन संपूर्ण व्यवस्थापनास जबाबदार धरून टोल नाक्यावर तातडीने बदल करण्याचे लेखी आदेश व समजपत्र पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आले. व भविष्यात वाहन चालकांकडून तक्रार दाखल झाल्यास व्यवस्थापना विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट लेखी आदेश पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आले.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, “राज्यातील बहुतांशी टोल नाके हे “वसुली अड्डे” बनत चालले आहेत.योग्य व ठोस असे टोल धोरण राज्याने न राबविल्यामुळे टोलचालक हे बेफान व बेलगाम होत असल्याचे दिसून आले आहे.
टोल च्या ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांच्या भरतीमुळे सर्वसामान्य नागरिक वाहन टोलवरून घेऊन जात असताना त्यांच्या दादागिरीला सामोरे जातात,पण कुटुंबा सोबत असल्यामुळे त्यांचा हा उद्धटपणा ते सहन करत असतात.
अनेक वादाचे प्रकारही अश्या ठिकाणी होत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे.
पिंपळगाव टोल नाका तर राज्यातील सर्वात बेशिस्त टोल नाका म्हणून उदयास आलेला आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यानां तसेच सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या ह्या उद्धट दादागिरीचा प्रत्यय आलेला आहे. अश्या टोलनाक्यावर कारवाई होणे आवश्यक होते.
त्यासाठी मी स्वतः अनेक दिवस शासनाकडे व पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा करत होतो.
त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलिसांनी २१ एप्रिल २०२३ रोजी समज पत्र देऊन कारवाई केली.व भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडला तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले. नागरिकांनाही समितीच्या वतीने आवाहन करण्यात येते की टोल नाक्यावर उद्धट वागणुकीचा अनुभव आल्यास तातडीने महामार्ग पोलीस किंवा स्थानिक पोलिसांना या बाबत तक्रार दाखल करावी.
पिंपळगाव टोल प्रकरणावरून नक्कीच सर्वसामान्यांना न्याय मिळण्याकरिता दिशा मिळेल यात शंका नाही.
पुणे विभागातील सोमाटणे व मोशी टोलनाके सुद्धा केंद्रीय टोल अधिनियमाचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.६०कि मी अंतरात २ टोलनाके नसावे असा नियम असताना लोणावळा,
वरसोली टोल व सोमाटणे टोल ३२ कि. मी अंतरात आहेत.त्यामुळे सोमाटणे टोल नाका बंद करण्यात यावा.असे समितीचे स्पष्ट मत आहे.तसेच मोशी टोल नाका महापालिका हद्दीपासून ५ किमी अंतरात असल्याने तो सुद्धा तात्काळ बंद करणे आवश्यक. राज्यातील सर्वच टोल नाक्यांची अशीच परस्थिती असल्याने माननीय मुख्यमंत्र्यांनी ठोस नागरिकांच्या हितासाठी योग्य व माफक खिश्याला परवाडणारे टोल धोरण आखणे गरजेचे आहे.
तरच ही” टोल धाड ” बंद होईल.असे प्राधीकरण नागरी सुरक्षा कृती सोसायटी(Pnsks) अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर श्री.विजय पाटील यांनी दिली.