एसटीच्या विविध उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठीशी असेल. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर account वर व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध उपक्रमांचा आज शुभारंभ करण्यात आला. ई-शिवनेरी बसचे लोकार्पण करण्यात आले तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला. प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांची एसटीचे सदिच्छादूत म्हणून घोषणा करण्यात आली. मुंबई– ठाणे- पुणे या मार्गावर इलेक्ट्रिकवरील १०० शिवनेरी बसेस धावणार आहेत.
एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठीशी असेल. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपली एसटी देखील अमृतमहोत्सवी वाटचाल करतेय ही अभिमानाची गोष्ट आहे. एसटीची सर्व बसस्थानके, स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर व प्रवासी बसेस या स्वच्छ व टापटिप असाव्यात यासाठी स्पर्धात्मक स्वरुपात अभियान राबवून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देवून गौरविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एसटी जशी ग्रामीण भागाचं प्रतिनिधीत्व करते त्याचप्रमाणे नवीन सदिच्छादूत मकरंद अनासपुरे यांची ओळख देखील ग्रामीण भागापर्यंत आहे, त्यांचं सामाजिक काम देखील मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचा फायदा एसटीला होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आज राज्यातल्या ९७ टक्के लोकांपर्यंत एसटी पोहचली आहे. पर्यावरण, प्रदूषण याचा विचार करून एसटीने इलेक्ट्रिक बस सेवा सुरु केल्याबद्दल एसटीचे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले.
राज्यातील ७५ वर्ष पूर्ण झालेल्या ८ कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाचा लाभ घेतला तर महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली आहे. दररोज १७ ते २० लाख महिला प्रवाशी याचा लाभ घेत आहेत, यामुळे एसटीकडे मोठ्या प्रमाणात प्रवाशी वळताहेत याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाच्या लोगोचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ‘एक मिनिट स्वच्छतेसाठी … एक मिनिट महाराष्ट्रासाठी’ या दृकश्राव्य संदेशाचे तसेच एसटीच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या लघुपटाचे प्रसारण करण्यात आले.