पाकिस्तानी एजंटसोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याप्रकरणी पुण्यातील डीआरडीओच्या शास्त्रज्ञांना अटक
महाराष्ट्र एटीएसने डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना गुरुवारी(4 मे) पाकिस्तानी एजंट सोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याप्रकरणी अटक केली आहे.
एटीएसच्या सूत्रांनी सांगितले की, शास्त्रज्ञ कुरुलकर यांना पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिंग (पीआयओ) च्या एका व्यक्तीने हनी ट्रॅप केले होते. त्यानंतर आरोपी शास्त्रज्ञाने संवेदनशील माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.
व्हिडिओ चॅट आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या संपर्कात तेआहे.
अशी माहिती डीआरडीओला देण्यात आली.एका अधिकाऱ्याने असे सांगितले की, संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर डीआरडीओच्या दक्षता विभागाने तपास सुरू केला आणि अहवाल तयार केला.या अहवाला बाबत विविध भारतीय तपास यंत्रणांना सांगण्यात आले. यानंतर महाराष्ट्र एटीएसने या प्रकरणाचा तपास करत डॉ.कुरुलकर यांना अटक केली. कुरुलकर या वर्षी नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत.
सूत्रांनी सांगितले की, फेब्रुवारीमध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणांना शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना अनावधानाने हनी ट्रॅप करण्यात आल्याची माहिती मिळाली.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एटीएसच्या प्रसिद्धी पत्रकात असे सांगण्यात आले आहे की, शास्त्रज्ञाला हे माहीत होते की जर त्याच्या ताब्यात असलेली गुप्त अधिकृत माहिती शत्रूला दिली तर देशाच्या सुरक्षेला हानी पोहोचेल असे असतानाही त्याने हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानी व्यक्तीला ही माहिती दिली. त्याआधारे त्याच्याविरुद्ध मुंबईतील एटीएसच्या काळाचौकी युनिटमध्ये अधिकृत गुप्तता कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.