आजच्या पिढीची थरारक साहित्याला पसंती – कवी सौमित्र
समाज माध्यमांच्या मुशीत वाढणारी आजची पिढी अनेक थरारक अनुभवांना सामोरी जाते. त्याच दिशेने त्यांची साहित्यिक अभिरुची होत असल्याने थरारक साहित्य ही त्यांची पहिली पसंती ठरत आहे. असे मत प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम तथा कवी सौमित्र यांनी व्यक्त केले.
पुणे नगर वाचन मंदिरातर्फे दिला जाणा कै. श्रीनिवास नारायण तथा श्री. ना. बनहट्टी पुरस्कार आज इंद्रायणी
प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि वसंत वसंत लिमये लिखित ‘टार्गेट असद शाह या थरार कादंबरीस प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम तथा कवी सौमित्र यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.सेवासदन संस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर पुणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष श्री.मधुमिलिंद मेहेंदळे आणि पुणे नगर वाचन मंदिराच्या सचिव सुवर्णा जोगळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कवी सौमित्र म्हणाले की, वसंत वसंत लिमये हा
झपाटलेला लेखक असून आयआयटी सारख्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेतल्यानंतरही गिर्यारोहण आणि भ्रमंतीचा छंद कायम ठेवून गिर्यारोहणाच्या अनेक मोहिमा त्यांनी आखल्या.या मोहिमा फते करताना त्यांनी केलेली निरीक्षणे, नोंदी, प्रसंग आणि अनुभव यांची योग्य सागंड त्यांच्या साहित्य निर्मितीत घेतली आहे. कोणत्याही लेखकासाठी केवळ प्रवासाच्या इच्छित स्थळी पोहोचणे महत्वाचे नसून त्याच्यासाठी हा प्रवास देखील महत्वाचा असतो.यावेळी पुरस्काराला उत्तर देताना वसंत वसंत लिमये म्हणाले की, आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनात अनेक घडामोडी घडत असतात. त्या घटनांमागील सत्यता आणि दाहक वास्तव हे सर्व सामान्यांपर्यंत पोहचतच नाही. ते न पोहचलेले वास्तव सर्वसामान्यां पर्यंत पोहोचविणे हा माझ्या लेखना मागील मुख्य प्रेरणास्त्रोत आहे. ठाण्यातील डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या पिच्छा पुरवण्याच्या स्वभावामुळे लिहिता झालेलो मी कालांतराने दिनकर गांगल यासारख्याव्यक्तिमत्वाच्या
संपर्कात आलो आणि सत्य आणि कल्पित यांची सरमिसळ आणि अभ्यास करून लिहिता राहिलो.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पुणे नगर वाचन मंदिराचे सहकार्यवाह प्रसाद जोशी यांनी संस्थेचे कार्य आणि भविष्यातील उपक्रमां विषयी माहिती दिली. प्रमुख अतिथी किशोर कदम यांचा परिचय श्री. विनायक माने यांनी तर पुरस्कारार्थी श्री. वसंत वसंत लिमये यांचा परिचय रोहित जोगळेकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता पुराणिक यांनी केली. पुणे नगर वाचन मंदिराचे कार्यकारणी सदस्य श्री. राजीव मराठे यांनी आभार मानले.