सिलेंडरचा स्फोट होवून वाघोली परिसर हादरला, ३ जणांचा आगीत मृत्यू
पुणे : वाघोली परिसरातील उबाळे नगर येथील ‘शुभ सजावट’ या मंडपाच्या गोडाऊनला काल (शुक्रवारी) रात्री आग लागली. या आगीत ४ सिलेंडरचा स्फोट झाला असून यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच पुणे ५ व पीएमआरडीए ४ अशी एकुण ९ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. या गोडाऊन जवळच एक रहिवासी इमारत आहे तर दुसऱ्या बाजूला गॅस सिलेंडरचे गोडाऊन आहे जिथे भरलेल्या स्थितीत ४०० गॅस सिलेंडर होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळ असलेल्या रहिवासी इमारतीतील सर्व रहिवाश्यांना इमारतीमधून बाहेर सुरक्षित जागी थांबायला सांगितले व आपत्कालीन परिस्थितीत जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी चांगले काम केले.
पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की,जवळच ४०० सिलेंडरचा साठा असलेले गोदाम आहे. त्या ठिकाणी आग पसरू नये म्हणून खबरदारी घेतल्याने मोठा अनर्थ टळला.