अपघात रोखण्यासाठी खंडाळा घाटात ‘हाइट बॅरिकेड’
१५ एप्रिलला खंडाळा घाटात शिंग्रोबा मंदिराजवळील दरीत ढोल-ताशा पथकाची बस कोसळून झालेल्या भीषण अपघातात १४ जणांचा बळी गेला होता. या घटनेनंतर महामार्ग पोलिस, खोपोली पोलिस, रस्ते विकास महामंडळ, ‘आयआरबी’ आदी सर्व यंत्रणांनी या ठिकाणी उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला माती टाकून रस्ता बंद करण्यात आला. मात्र, त्याचा उपयोग न झाल्यामुळे खंडाळा घाटातील दस्तुरी गावाच्या हद्दीतील मॅजिक पॉइंट येथून जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून खोपोलीकडे जाणाऱ्या व खोपोलीहून लोणावळ्यात येणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे जोडला गेला आहे, तेथे मॅजिक पॉइंट आणि अंडा पॉइंटजवळ ‘हाइट बॅरिकेड’ बसविण्यात आले आहेत.
अवजड वाहनांसाठी धोकादायक रस्ता
खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाच्या परिसरामध्ये सातत्याने वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी अनेक लहान व अवजड वाहने मॅजिक पॉइंट येथून जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून खोपोलीकडे; तसेच पुढे कर्जतमार्गे कल्याण, ठाणे व मुंबईकडे जातात. मुंबई, कल्याण, ठाणे, कर्जत आणि खोपोलीमार्गे लोणावळ्याकडेही येतात. मात्र, हा मार्ग अवजड वाहनांसाठी धोकादायक आहे. खंडाळा (बोरघाट) घाटातील तीव्र उतार व नागमोडी वळणाचा रस्ता; तसेच काही ठिकाणी वळणाचा, मोठ्या चढणीचा रस्ता आहे. यामुळे घाटातील शिंग्रोबा मंदिर परिसरात सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या उपाययोजना मधील हा एक भाग आहे.