जनसंवाद सभेला येणारे ‘तेच ते नागरिक’ करतात चढ्या आवाजात तक्रारी
नवी सांगवी : नागरी प्रश्नांच्या निराकरणासाठी महापालिकेच्या ‘ह ‘क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी जनसंवाद सभा पार पडली.परंतु यामध्ये इच्छुक उमेदवार
सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक यांचे समर्थक असे तेच ते चेहरे जनसंवाद सभेला पहावयास मिळत आहेत.
एकाच वेळेस प्रभागातील चार ते पाच तक्रारी ते वारंवार घेऊन येत असल्याचेही दिसून आले.तसेच मुख्य समन्वय अधिकारी व उपस्थित प्रशासन अधिकारी यांच्याशी ते चढ्या आवाजात बोलून तक्रारी करीत असल्याचे दिसून येत आहे.तरीही समन्वय अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी शांततेत तक्रारींचे निरसन कसे करता येईल यासाठी प्रयत्न करताना पहावयास मिळाले.
दापोडी परिसरातील पाणीपुरवठा समस्या, ड्रेनेज तुंबणे, स्टॉर्म वॉटर लाईन तुंबणे,अर्धवट रस्त्यांची कामे पावसाळ्या पूर्वी पूर्ण करणे,पदपथा वरील अतिक्रमणे,
रस्त्याच्या कडेला अवैधरीत्या पार्किंग समस्या याबाबतच्या तक्रारी सर्वाधिक होत्या. मुख्य समन्वय अधिकारी यांनी तत्काळ या तक्रारींची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तक्रारींचे निरसन केले.या सभेमध्ये मुख्य समन्वय अधिकारी म्हणून महापालिकेचे उपायुक्त समाज विकास विभाग तथा मुख्य समन्वय अधिकारी अजय चारठणकर, क्षेत्रीय अधिकारी सुषमा शिंदे याप्रसंगी उपस्थित होते. सभेला एकूण १० तक्रारी अर्ज आले होते. यामध्ये कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव, संत तुकारामनगर आदी परिसरातून आलेले नागरिक तक्रार अर्ज घेऊन आले होते.
सामाजिक तक्रारी असतील तर कामकाजाच्या वेळी ‘ह’क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित विभागाशी संपर्क करावा आणि वैयक्तिक तक्रारी जर असतील तर जनसंवाद सभेत उपस्थित कराव्यात, अशी समज मुख्य समन्वय अधिकारी यांच्याकडून कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.
याप्रसंगी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते तक्रारी घेऊन आले असता मुख्य समन्वय अधिकारी यांनी या वेळी तक्रारी जाणून घेऊन त्याचे निरसन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जनसंवाद सभेला नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारी कमी आणि सामूहिक समस्या तक्रारी मांडत आहेत. सार्वजनिक विषय जे आहेत, ते बजेट इतर बाबींच्या अनुषंगाने तक्रार निवारण करण्यात येते असे अजय चारठणकर, मुख्य समन्वय अधिकारी यांनी सांगितले.