मोबाईल चोरी तपास प्रकरणी पोलिसांची चांगली कामगिरी
पिंपरी- चिंचवड शहरात मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात रोज वाढत आहेत. अशावेळी पिंपरी- चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट एक ने केलेली कामगिरी नक्कीच दिलासादायक मानली जात आहे. याबाबतची माहिती अशी की चोरीला आणि गहाळ झालेल्या ६९ मोबाईलचा शोध घेऊन पैकी १८ मोबाईल मूळ मालकांना परत केले आहेत. ६९ मोबाईल चोरी प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले पैकी एक जणअल्पवयीन
आहे. या कामगिरीमुळे एमआयडीसी भोसरी आणि सांगवी पोलीस ठाण्यातील नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपी मागील काही दिवसांपूर्वी पेट्रोल पंपावर काम करायचे. काम सोडून त्यांनी मोबाईल चोरीचे प्रकार सुरू केले. तिघांनी मिळून पिंपरी चिंचवड शहर परिसरातून ६९ मोबाईल फोन चोरी केले. त्यातील २३ मोबाईल फोन प्रकरणी दाखल असलेले नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. तर ४६ मोबाईल फोनच्या मूळ मालकांचा शोध सुरू आहे. त्यातील १८ मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयावरून तीन जणांना गुन्हे शाखा युनिट एक ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर ६९ मोबाईल फोन त्यांच्याकडे असल्याचं पुढे आले. त्यातील २३ मोबाईल फोन बाबत जबरी चोरीचे आठ आणि घरफोडीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. यामध्ये एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील सात, तर सांगवी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार (सायबर गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख, पोलीस अंमलदार फारुक मुल्ला, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, स्वप्नील महाले, मारुती जायभाय, विशाल भोईर व तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांनी ही कारवाई केली आहे.