22 किलो गांजा विक्री करणारे तरुण पोलिस पथकाच्या सापळ्यात दोघांना अटक
खडकी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. नवीन उमाकांत पिल्ले (वय 34, रा. खडकी), जितेंद्र कुलदीपसिंग मुलगानी (वय 32, रा. भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पिल्ले आणि मुलगानी गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचला.पोलिसांना पाहताच पिल्ले आणि मुलगानी दुचाकीवरुन पसार झाले. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले. त्यांची झडती घेण्यात आली. त्यांच्याकडून 22 किलो गांजा, दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक निरीक्षक अमर कदम, उपनिरीक्षक वैभव मगदूम, उपनिरीक्षक भानुदास भालेराव, तानाजी कांबळे, संदेश निकाळजे, जहांगिर पठाण, ऋषिकेश दिघे, शिवराज खेड सागर जाधव आदींनी ही कारवाई केली.