पोलिसांच्या सतर्कतेमुळे नागरिकांना लुटण्याचा डाव फसला; पाच दरोडेखोर अटकेत
वाकड स्मशानभूमी शेजारी सोमवारी (दि.15) मध्यरात्री रस्त्याने एकट्या जाणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना शस्त्रासह वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सहकारी हे पेट्रोलींग करत असताना , वाकड येथील स्मशान भूमीजवळ अंधारात काही इसम संशयीतरित्या उभे असलेले पोलिसांना दिसले. पोलीसांची चाहूल लागताच आरोपी त्यांच्या दुचाकीवरून पळून जात होते.
पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. पंचासमक्ष पोलिसांनी त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्याकडून पोलिसांनी तीन कोयते व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा एकूण 1 लाख 1 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता ते रस्त्याने एकटे जाणाऱ्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यासाठी थांबल्याचे त्यांनी कबुल केले.
प्रमोद दयानंद कांबळे (वय 21 रा. रहाटणी), प्रफुल्ल राजू वाघमारे (वय 21 रा.थेरगाव), पवन शहादेव जाधव (वय 21 रा.रहाटणी), रोहीत राहूल शिंदे (वय 19 रा.रहाटणी), राहूल कॅप्टन मोरे (वय 20 रा.पिंपळे गुरुव) अशी अटक आरोपींची नावे असून वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अजय फल्ले यांनी वाकड पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.
