सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे हत्या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपविण्याची किशोर आवारे यांच्या पत्नीची मागणी
तीन दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आलेल्या
तळेगाव सामाजिक कार्यकर्ते आणि जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या कुटुंबीयांची पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेत सांत्वन केले.आणि किशोर आवारे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या भेटीदरम्यान किशोर आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी माझा मुलगा तळेगावकरांची प्राणपणाने सेवा करत होता. तळेगावकरांना न्याय द्यावा. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. तसेच या हत्या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपविण्याची मागणी किशोर आवारे यांच्या पत्नीने पाटील यांच्याकडे केली आहे. आवारे यांच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या दुःखातून सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो अशी प्रार्थना करीत पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आवारे कुटुंबाला धीर दिला.तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही देखील आवारे कुटुंबियांना दिली. यावेळी भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे,माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
जनसेवा विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेत मावळचे आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या भावाविरोधात आवारे कुटुंबियांनी गुन्हा दाखल केला. मात्र या घटनेतील आरोपी वेगळाच निघाला. त्यामुळे झालेले आरोप पाहता सुनील शेळके यांच्या प्रतिमेला हा निश्चितच धक्का होता. त्यामुळे सुनील शेळके यांना समर्थन देण्यासाठी रविवारी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते.
माजी नगरसेवक भानुदास खळदे यांच्याशी किशोर आवारे यांचा वाद झाला होता. त्यावेळी आवारे यांनी खळदे यांच्या कानाखाली मारली होती. त्याचा राग खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याच्या मनात होता. त्याच रागातून गौरव याने कट रचत मित्रांना सुपारी देऊन नगर परिषदेच्या कार्यालयासमोर आवारे यांना गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून त्यांचा खून केला.