लव जिहादच्या निषेधार्थ पुण्यात मोर्चा
देशभरात वाढत चाललेल्या लव जिहादच्या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
पुण्यातील गंजपेठेतील सावित्रीबाई फुले स्मारक ते लोहियानगर पोलिस चौकीपर्यंत हा मोर्चा निघाला होता. या मोर्चात विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. तसेच यावेळी लव जिहाद विरुध्द जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर खडक पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक संगीता यादव यांना विविध मागण्यांचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी दिले.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पुणे शहर अध्यक्ष धनंजय गायकवाड म्हणाले की, देशात लव जिहाद सारख्या घटना घडत आहे.त्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने विशेष कायदा करावा.पुणे शहरात देखील लव जिहाद सारख्या घटना समोर आल्या आहेत.हिंदू महिलांवर फसवणुकीच्या व अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
तसेच शहरातील वसाहतीमध्ये रोहिंग्यांचे प्रमाण वाढले असून आपल्या नागरिकांना बाहेर काढले जात आहे. त्या नागरिकांचा शोध पोलिसांनी घेऊन कडक करावी. या सर्व मागण्यांची दखल केंद्र सरकार आणि पोलिस प्रशासनाने घ्यावी. अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.