किशोर आवारे हत्या प्रकरणात माजी नगरसेवक भानू खळदे यांचा हात
तळेगांव दाभाडे : तळेगावच्या जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. माजी नगरसेवक भानू खळदे यांनीच बदला घेण्यासाठी या हत्येचा कट रचल्याचं तपासात समोर आलं आहे.
याआधी, माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्यासाठी या हत्येचा कट रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं आणि त्यानुसार गौरव खळदे याला अटक देखील करण्यात आली. मात्र या हत्येमागे गौरवचा प्लॅन नसून त्याचे वडील भानू खळदे स्वतः असल्याची कबुली गौरव आणि इतर आरोपींनी दिली आहे. त्यानुसार आता भानू खळदे यांनाही आरोपी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
तळेगाव नगर परिषदेसमोर किशोर आवारे यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण पुणे (Pune) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. 12 मे रोजी किशोर आवारे यांची हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी अगोदर 7 जणांना अटक केलेली आहे, त्यांना आता न्यायालयाने 25 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.