‘अनादि मी अनंत मी’ कार्यक्रमातून सादर झाला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा जयजयकार
मातृभूमीच्या सेवेसाठी आपले अवघे जीवन समर्पित करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा जयजयकार “अनादि मी अनंत मी” या कार्यक्रमातून सादर केला गेला.हळव्या मनाचे कवी, नाटककार,इतिहासकार असे शतपैलू व्यक्तिमत्व असलेल्यास्वा.सावरकरांच्या जीवन चरित्राचा वेध काल सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात घेतला गेला.
संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीच्या साहित्य,संगीत,नृत्यविधा कलाकारांचे अतिशय प्रभावी सादरीकरण हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.समितीने सादर केलेल्या या कार्यक्रमाची संकल्पना श्री.हर्षद कुलकर्णी,दिग्दर्शन समिती अध्यक्ष श्री.सचिन काळभोर यांचे होते,निर्मिती सौ. सुवर्णा बाग,तर संहिता लेखन सौ.विशाखा कुलकर्णी व सौ.शुभदा दामले यांनी केले होते.
पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन व विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त ‘वीरभूमी परिक्रमा’ या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रातील ५ शहरांमध्ये करण्यात आले आहे. यातील सांगली आयोजनातील हे पाचवे पुष्प काल दि.२५मे रोजी विष्णुदास भावेनाट्यमंदिर येथे ‘अनादि मी अनंत मी’ या कार्यक्रमाने गुंफले गेले.भारतीय स्वातंत्र्य लढयात सावरकरांनी दिलेलं अमूल्य योगदान, सावरकरांचे प्रखर विचार, मराठी भाषा,साहित्य,विज्ञान अशा वेगवेगळ्या विषयांवर सावरकरांनी केलेलं लेखन, याचा एकत्रित आढावा यात घेतला गेला. अभिवाचन, नृत्य, गीते हे सर्व एक सूत्रात गुंफून केलेल्या ह्या प्रभावी सादरीकरणास सांगलीकर रसिकांनी विशेष पसंती दिली.संगीत विधेच्या स्वरेषा पोरे,नादमयी पोरे,यांनी सादर केलेल्या “शतजन्म शोधताना”,’अखिल हिंदू विजय ध्वज’ या गीतांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालातसेच ‘सागरा प्राण तळमळला’ या गीताने रसिक भारावून गेले.या सर्व गीतांना त्यांच्या छोट्या विद्यार्थी शिष्यांनी अतिशय सुंदर साथ दिली.यामधे वैष्णवी कणसे,चिन्मय धारवाडकर,सारंग मुचरीकर,नंदिनी कोतेवार.या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.तबल्याची उत्तम साथ श्री मिलिंद लिंगायत यांची होती.
नृत्य विधा कलाकारांनी स्वा.सावरकर लिखित ‘ये हिंदोस्ता मेरा ‘ ह्या गझल रचनेचे अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केले.
‘जय जय शिवराय आरती’, ‘तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू’ आणि ‘ जयोस्तुते या नृत्य सादरीकरणाने रसिक भारावून गेले.या नृत्य सादरीकरणात नृत्य विधा संयोजक साै.वरदा वैशंपायन,राधिका बाग,जाई दामोदरे,कल्याणी कुलकर्णी यांचा सहभाग होता.साहित्य विधेच्या कलाकारांनी केलेले सुरेख
प्रभावी अभिवाचन यामुळे ‘अनादी मी अनंत मी’ या कार्यक्रमाची रंगत वाढत गेली.यात साहित्यविधा संयोजक प्रणिता बोबडे, सहविधा संयोजक शुभदा दामले,प्रिया जोग,सुचेता सहस्त्रबुद्धे,गौरी रेमणे प्रणाली महाशब्दे,यांचा सहभाग होता.
या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून सांगली मधील प्रतिथयश उद्योजक श्री.मिलिंदजी गाडगीळ, डॉ. प्रसाद केळकर, डॉ. सागर मोरे, श्री. गिरीश चितळे, प्रा. अभिजित राजपूत उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन विवेक व्यासपीठाचे कृष्णात कदम आणि सुहास कुलकर्णी यांनी केले होते.या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी संस्कार भारती सांगली जिल्हा समिती,जायंटस ग्रुप ऑफ सांगली सेंट्रल, लोकमान्य टिळक स्मारक मंदिर,विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगली, सांगली जिल्हा नगर वाचनालय, जायंट्स ग्रुप ऑफ विश्रामबाग सहेली, शिवतीर्थ प्रकाशन या संस्था यांच्याकडे होती.