अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाई कधी? हिंजवडीत महाकाय होर्डिंग कोसळले.
आज झालेल्या जोरदार वादळामुळे हिंजवडीतील लक्ष्मी चौक मारुंजी रोडवरील अनाधिकृत असलेले महाकाय होर्डिंग रस्त्यावर कोसळले असून यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी तीन ते चार लोकांना किरकोळ मार लागलेला आहे. हिंजवडी-मारूंजी रोड,पद्मभूषन चौक,हॅाटेल पुणेरी मिसळ शेजारी हिंजवडी मारूंजी रोड शिंदे चौक या तीन ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले आहेत . या परिसरातील धोकादायक होर्डिंग बाबत ग्रामस्थांनी लेखी तक्रार करूनही त्यावर अद्यापही कारवाई झालेली दिसून येत नाही. तीनशे ते साडेतीनशे इतक्या मोठया प्रमाणात यापरिसरात अनधिकृत होर्डिंग उभे असून यावरती कारवाई कधी केली जाणार असा प्रश्न नागरिक विचारताना दिसून येत आहेत. सध्या पावसाळा जवळ येत असून मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण ?असा नागरिक प्रश्न विचारताना दिसून येत आहेत.काही दिवसांपूर्वी देहूरोड,किवळे येथे झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने आयटी नगरीतील सर्व धोकादाय होर्डिंग बाबत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते हे ऑडिट पूर्ण झाले की नाही झाले ?प्रशासन यावरती कधी कारवाई करणार? याकडे या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
आयटी नगरी परिसरात प्रामुख्याने पीएमआरडीए, एमआयडीसी, महापालिका, पीडब्ल्यूडी आणि ग्रामपंचायत अशा स्वतंत्र अधिकार असलेल्या पाच स्वायत्त संस्था काम करतात एखादी मोठी दुर्घटना झाली तर कारवाई कोण करणार याचा अभाव निर्माण झालेला दिसून येतो.
हिंजवडीत लक्ष्मी चौक हा नेहमीच वर्दळीचा चौक असून प्रवास करणाऱ्या वाहनांची येथे वर्दळ पाहायला मिळते. याच प्रमुख चौकात अनेक छोटी छोटी दुकाने असून या दुकानांवरती महाकाय धोकादायक पद्धतीने अनेक अनधिकृत होर्डिंग उभी असलेली दिसतात. अशा ठिकाणी जर का अपघात झाला तर शेकडो जणांचा बळी जाऊ शकतो मात्र प्रशासन अद्यापही कारवाई करण्यासाठी वेळकाढू पणा करताना दिसून येत आहे.
आयटी नगरी परिसरामध्ये जवळपास तीनशे ते साडेतीनशे अनाधिकृत होल्डिंग उभे असून काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडे याबाबत लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे तरी देखील परिसरातील अनाधिकृत होर्डिंग वरती कारवाई होताना दिसून येत नाही. असे अजय साखरे (हिंजवडी)यांनी सांगितले.