अनधिकृत जाहिरात फलक कारवाईस दिरंगाई*..*दोन परवाना निरीक्षकांना नोटीस
देहूरोड किवळे येथे17 एप्रिल रोजी अनधिकृत जाहिरात फलक कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले. या घटनेनंतर शहरातील अधिकृत आणि अनधिकृत जाहिरात फलकांचा प्रश्न ऐरणीवर आला.शहरातील अशा अनधिकृत जाहिरात फलकांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले गेले असूनही होर्डिंगवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात होती.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाच्या दोन परवाना निरीक्षकांना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.
आकाश चिन्ह व परवाना विभागाचे परवाना निरीक्षक राजेश बांदल, सुभाष मळेकर या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील सर्व अनधिकृत फलकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.
या सर्व्हेत तब्बल 92 नवीन अनधिकृत जाहिरात फलक आढळून आले. त्यानंतर या फलकांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले होते. आयुक्तांच्या आदेशानुसार आकाश चिन्ह व परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी अनधिकृत फलक आणि न्यायालयात गेलेल्या ज्या जाहिरात फलकाची स्ट्रक्चर स्टॅबिलिटी आलेली नाही, अशांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
परवाना निरीक्षक मळेकर यांनी आपल्या कार्यक्षेत्रात किवळे चौकामध्ये कृष्णा हॉटेलचे आवारातील जाहिरात फलकावर आणि न्यायालयात गेलेल्या ज्या जाहिरात फलकाची स्ट्रक्चर स्टॅबिलिटी आलेली नाही, अशा फलकांवर कारवाई केली नाही. परवाना निरीक्षक बांदल यांच्या कार्यक्षेत्रातील नाशिकफाटा उड्डाणपुलाचे बाजूस डबल डेकर जाहिरात फलक आहे.
या फलकावर कारवाई करण्याचे लेखी, तोंडी आदेश देऊनही त्यांनी संबंधित फलकावर कारवाई केली नाही. मळेकर आणि बांदल यांनी वरिष्ठांच्या सूचनांचे, आदेशाचे पालन केले नाही. यामुळे कार्यालयीन कामकाजामध्ये अडथळा निर्माण होत असून ही बाब कार्यालयीन दृष्टया योग्य नाही.
त्यामुळे कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवत तुमच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच 24 तासात लेखी खुलासा करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त वाघ यांनी दिले आहेत.