डिजिटल मिडियासह इलेक्ट्रॉनिक्स माध्यम अस्थापनांना “श्रमिक पत्रकार” कक्षेत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय
भिलार-महाबळेश्वर येथे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्राच्या पहिल्या ऐतिहासिक अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील डिजिटल मिडिया पत्रकारांना दिलेला शब्द आज खरा करुन दाखविला. डिजिटल मिडियासह इलेक्ट्रॉनिक्स माध्यम अस्थापनांना “श्रमिक पत्रकार” कक्षेत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्या बद्दल डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिलार महाबळेश्वर येथे झालेल्या महाराष्ट्राच्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना पहिल्या अधिवेशनाचे वेळी ऑनलाइन भाषण करुन उद्घाटन केले त्यादरम्यान डिजिटल मिडिया क्षेत्राचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाद्वारे दिला होता.डिजिटल मिडियाला पत्रकारिता माध्यम म्हणून मान्यता देवून सरकार दरबारी नोंदणी व्हावी, मुद्रित माध्यमांप्रमाणे डिजिटल मिडिया ला नियमित जाहिराती मिळाव्यात, डिजिटल पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका दिल्या जाव्यात यासह सोळा मागण्या करणारे ठराव अधिवेशनात करण्यात आले होते.
त्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा सक्रीय सहभाग होता.
राज्यातील सुमारे दोन हजार प्रतिनिधींच्या उपस्थित पार पडलेल्या अधिवेशनात मांडलेले सर्व प्रश्न मार्गी लागण्याची प्रक्रिया आज मंत्रिमंडळाच्या निर्णयाद्वारे सुरु झाली आहे. संघटनेचे राज्यातील सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांच्यावतीने राजा माने यांनी शिंदे – फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.