तोतया आयएएस अधिकारी तायडे यांस तळेगांव दाभाडे येथे अटक
तळेगांव दाभाडे : पुणे औंध परिसरातील एका सोसायटीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या तोतया आयएएस अधिकारी तायडे याला तळेगाव दाभाडे येथून अटक करण्यात आली आहे.
वासुदेव निवृत्ती तायडे (वय 54 वर्ष रा प्लॉट नं.336, रानवारा रो हाऊस तळेगाव दाभाडे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आयएएस तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. वासुदेव तायडे यांनी आपले खरे नाव लपवून डॉ विनय देव असे नाव लावले होते. आपण आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात गोपनीय काम करत असल्याचे तो लोकांना सांगत होता.
औंध परिसरातील सिंध हाऊसिंग सोसायटी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हा व्यक्ती हजर होता. त्यानंतर पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने अधिक चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंध हाऊसिंग सोसायटी येथे बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशन या संस्थेच्या कार्यक्रमामधे जम्मु काश्मीर येथे मदतीसाठी पाठवीण्याकरीता अॅम्बुलन्स लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून हजर असलेला डॉ. विनय देव (खोटे नाव) हा व्यक्ती आपण आयएएस अधिकारी असल्याचे दाखवून पंतप्रधान कार्यालयात सेक्रेटरी पदावर गोपनीय काम करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र त्याने सांगितलेल्या माहितीबाबत त्यांचेकडे संस्थेच्या पदाधिकारी यांनी अधिक विचारणा केली असता त्यांच्या आयएएस पदाबाबत त्यांना संशय वाटला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याबाबत विनय देव (खोटे नाव) याचा शोध घेऊन तळेगाव दाभाडे येथील घरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने आपले खरे नाव वासुदेव तायडे असल्याचे सांगितले. तसेच आपण आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगून लोकांमध्ये वावरत असल्याची ही कबुली त्याने दिली. चतु:शृंगी पोलीस पुढील तपास करीत आहेत.