चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पती फरार
पुणे : आरती विकास झा (वय 26 रा कोंढवा) या महिलेचा खून पती रणजीत उर्फ विकास झा याने केला आहे. पुण्यातील कोंढवा भागात हे जोडपे राहत होते. पतीने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून हा खून केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती रणजीत उर्फ विकास झा आणि मृत आरती विकास झा हे कोंढवा भागातील पिसोळी येथील पद्मावती हाईटस इमारतीमधील फ्लॅट क्रमांक 502 मध्ये राहण्यास होते. आरोपी रणजीत हा पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घ्यायचा.यावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. असाच वाद काल देखील दोघांमध्ये झाला, त्यानंतर आरोपी रणजीत याने पत्नी आरती झोपली असताना रागाने तिच्यावर चाकूने वार केले. यामध्ये आरतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले.