आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी महापालिके कडून जोरदार तयारी
पिंपरी चिंचवड : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा आस्थेचा विषय, या सोहळ्यात लाखो वारकरी पंढरपूरला पायी जात विठुरायाच्या चरणी लीन होतात. जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम एक दिवस PCMC मध्ये असतो. आषाढीवारी पालखी सोहळा आणि मुक्कामाच्या स्थळाची पाहणी आयुक्त सिंह यांनी केली.त्या निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने देण्यात येणा-या सेवा सुविधामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखी सोहळा स्वागताचे नियोजन उत्तम पध्दतीने करावे. पालखी मार्गावरील खड्डे बुजवावेत, अशा सूचना प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी अधिका-यांना दिल्या. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, आरोग्य, उद्यान, शिक्षण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विभागांनी आपसात समन्वय ठेवून पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आवश्यक तयारी पूर्ण करावी. पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम तसेच पालखी मुक्काम, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था ठेवावी असे निर्देश आयुक्त सिंह यांनी यावेळी संबंधितांना दिले.
देहुतून निघालेल्या पालखीचा प्रवेश निगडी येथील भक्ती शक्ती येथून होतो. याठिकाणी महापालिकेच्या वतीने स्वागतकक्ष उभारला जातो. येथे करण्यात येणा-या व्यवस्थेबद्दलची माहिती आयुक्त सिंह यांनी घेतली. आकुर्डी येथील विठ्ठल मंदीरामध्ये भेट देवून तेथील पाहणी आयुक्तांनी केली येथे जगदगुरुसंत तुकाराम महाराज पालखी मुक्काम असतो.
आकुर्डी येथील अब्दुल कलाम आझाद उर्दू माध्यमिक विद्यालय, वसंतदादा पाटील प्राथमिक शाळा येथे विविध दिंड्यांचा मुक्काम असतो. येथे भेट देवून तेथील व्यवस्थेचा आढावा आयुक्त सिंह यांनी घेतला. दिंड्यांच्या मुक्काम ज्या महापालिकेच्या शाळांमध्ये असतो तसेच इतर खाजगी ठिकाणी असतो तेथे महापालिकेच्या वतीने आवश्यक सुविधा पुरविण्याच्या सूचना आयुक्त सिंह यांनी दिल्या. शौचालय व्यवस्था, स्नानगृह, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा अशा आवश्यक सर्व सुविधा
उपलब्ध करुन देताना प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र समन्वयकाची नेमणूक करण्यात यावी असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग, विसाव्याचे ठिकाण तसेच महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणा-या स्वागत कक्षाच्या ठिकाणाची पाहणी आयुक्तांनी केली. तसेच, इंद्रायणी नदीमधील जलपर्णी काढण्याचे काम महानगरपालिकेच्या वतीने आळंदी येथे सुरु आहे. याठिकाणची पाहणी देखील त्यांनी केली. आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे तसेच आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.