समुपदेशन कार्यक्रमातून चार वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीसोबत घडलेली बलात्काराची घटना उघड
पुणे येथील कोंढवा परिसरात चार वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलीसोबत ही धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत समुपदेशन कार्यक्रम चालू असताना तिने ही माहिती समोर आणली. जेव्हा ती तेरा वर्षाची होती आणि सातवीच्या वर्गात शिकत होती तेव्हा तिच्यावर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याचे तिने सांगितले आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 वर्षीय पीडित मुलीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.
मुन्ना नदाफ याच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2018 ते 2019 दरम्यान घडला आहे. आरोपींविरोधात भादवी 376 376 ड 376 ड ब 376 अ ब 342 सह पोक्सो एक्ट कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आता दहावीच्या वर्गात शिक्षण घेते. तिच्या शाळेत समुपदेशनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमादरम्यान शाळेतील महिला शिक्षिका विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना पीडित मुलीने ही तिच्या सोबत घडलेली घटना त्यांना सांगितली. आरोपी आणि पीडिता हे एकाच परिसरात राहण्यासाठी आहेत. त्यांचा एकमेकांशी परिचय देखील आहे. 2018 ते 2019 या कालावधीत पिडीत मुलगी सहावी मध्ये असताना घराशेजारील गल्लीत खेळत होती.यावेळी एका घराच्या खिडकीतून काहीतरी वस्तू खाली पडली होती. पडलेली वस्तू देण्यासाठी मुलगी त्या घरात गेली असता घरात असणाऱ्या आरोपींनी पीडित मुलीला घरात ओढून घेऊन आतून कडी लावून घेतली. त्यानंतर या मुलीचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून मोठ्या आवाजात म्युझिक लावून तिच्यावर तीनही आरोपींनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला व या संपूर्ण प्रकाराविषयी कुणाला काही सांगितल्यास आम्ही तुझे व घरच्यांचे हाल करू अशी धमकी दिली.
या संपूर्ण घटनेची तक्रार आल्यानंतर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुन्ना नदाफ या आरोपीला अटक केली आहे व इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.