मस्ती की पाठशाळेतील बांधकाम मजुरांच्या मुलींचे दहावी परीक्षेत घवघवीत यश
पिंपरी चिंचवड रावेत येथील बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी चालवली जात असलेली मस्ती की पाठशाळा मधील दोन विद्यार्थिनींनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. अतिशय खडतर परिस्थितीवर मात करून या मुलींनी हे यश संपादन केले असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
संजना गौतम वानखेडे हिला 74.20 टक्के आणि आचल संघपाल पाटोळे हिला 50.20 टक्के गुण मिळाले आहेत. संजना आणि आचल या दोघींचे मूळ गाव बुलढाणा आहे. त्यांचे वडील मागील आठ वर्षांपूर्वी कामाच्या शोधात शहरात आले. रोजच्या पोटाचा प्रश्न सोडविण्या साठी बांधकाम साईटवर मजुरीचे काम त्यांनी सुरु केले.
सहगामी फाउंडेशन संचलित मस्ती की पाठशाळा ही बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी चालवली जाणारी शाळा आहे. प्रत्यक्ष बांधकाम साईटवर जाऊन तिथे मुलांना शिकवण्याचे काम केले जाते. प्राजक्ता रुद्रवार, केतकी नायडु, रोशनी राय, अनिता माळी या शिक्षिका या पाठशाळेत शिकवण्याचे काम करतात.
आपली मुलगी शिकायला हवी,अशी या दोघींच्या पालकांची इच्छा होती. त्यातून त्यांनी शिकवण्याची तयारी दाखवली आणि मुलींनी प्रतिकूल परिस्थितीत कुठलाही क्लास न लावता घवघवीत यश मिळवले. संजनाचे वडील बांधकाम साईटवर तर आई हाउस कीपिंगचे काम करते.
तिने म्हाळसाकांत विद्यालयातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
बांधकाम कामगार आणि इतर मजुरी काम करणाऱ्या आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना या शिक्षिका शिक्षणाचे महत्व पटवून देतात. मुलांच्या शिक्षणाचे महत्व सांगितले जाते.
पालक मुलांना शाळेत पाठवण्यासाठी तयार झाल्यानंतर विविध संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीने या मुलांना शिक्षणासाठी मदत केली जाते. ज्या मुलांना शाळेत जाणे शक्य नाही, त्यांना मस्ती की पाठशाळा मार्फत बांधकाम साईटवर जाऊन शिक्षणाचे धडे दिले जातात.