पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील वाहतूक पोलिसांसाठी ‘मेंटल वेलनेस प्रोग्राम’
शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये वाहतूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि वार्डन गर्दीच्या ठिकाणी, वाहतूक नियमन करत असतात. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलीस कारवाई देखील करतात. अशा वेळी वाहतूक पोलिसांसोबत अनेक वाहन चालक वाद घालतात. अशा प्रकारच्या रोजच्या घटनांमुळे वाहतूक पोलिसांचे मानसिक आरोग्य बिघडते. त्यातून त्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.
प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहतुक सुरळीत करण्यासाठी सातत्याने काम करताना अनेकदा वाहतूक पोलिसांचा वाहन चालाकांसोबत वाद होतो. वारंवार होणारे वाद, घरगुती ताणतणाव, वैयक्तिक अडचणी यामध्ये मानसिक संतुलन राखणे आवश्यक ठरते. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील वाहतूक पोलिसांसाठी ‘मेंटल वेलनेस प्रोग्राम’ घेण्यात आला.
वाहतूक पोलिसांनी त्यांचे मानसिक आरोग्य कसे राखावे यासाठी एम पॉवर, आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट वाकड यांच्या मार्फत मानसोपचार तज्ञांचे मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. याचा वाहतूक पोलिसांना चांगला फायदा झाल्याचे सांगण्यात आले.
सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे वरिष्ठ व्यवस्थापक मोहम्मद अन्सारी, मानसोपचारतज्ज्ञ भविथा थॉमस, शिल्पा जगताप, महादेव जगताप यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयत्न केले.