जास्तीचे पैसे लावण्यावरून जाब विचारला, म्हणून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची ग्राहकाला मारहाण
वाकड येथे डिझेल भरण्यासाठी ग्राहक गेला असता मिटरमध्ये आधीच 57 रुपये शुल्क लावत डिझेल भरण्यास सुरुवात केली. यावेळी ग्राहकाने पेट्रोलपंप कर्मचाऱ्याला हटकले, त्याचा राग धरून कर्मचारी व त्याच्या साथीदारांनी मिळून ग्राहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. हा प्रकार बेंगलोर मुंबई महामार्गावरील वाकड येथील बालवडकर पेट्रोल पंपावर शुक्रवारी (दि. 2) घडला.
याप्रकरणी संदिप कृष्णा खिलारे (वय 36 रा. हडपसर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून योगेश बळी शिंदे (वय 32 रा. सोमाटणे फाटा), तुकाराम संजय सोमवंशी (वय 30 रा. कात्रज) व त्यांचे इतर चार साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मामा हे त्यांच्या महिंद्रा स्कॉर्पीओ या गाडीने पेट्रोल पंपावर गेले. तेथे त्यांनी उपस्थित कर्मचारी योगेशला दिड हजार रुपयांचे डिझेल टाकण्यास सांगितले. यावेळी आरोपीने सुरवातीलाच मिटर 57 रुपयांपासून पुढे लावण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादीने आरोपीला जाब विचारला. त्यावेळी आरोपी योगेश ने दुसरा कर्मचारी तुकाराम ला बोलावले व घडलेले सांगितले. तुकाराम याने रागात येवून शिवीगाळ करत फिर्यादीशी वाद घातला. इतर कामगारांनाही बोलावून फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.