अपघाताचा ‘root cause’ समजला आहे – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव
एएनआय या वृत्तसंस्थेस माहिती देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या प्राणघातक रेल्वे अपघाताचे मूळ कारण ओळखले गेले आहे, परंतु त्यांनी अधिक तपशील सांगण्यास नकार दिला. वैष्णव म्हणाले की, ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम सध्या जोरात सुरू आहे आणि सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ते पुढे म्हणाले की बुधवार संध्याकाळपर्यंत ट्रॅक पुन्हा सुरू करण्याचे काम पूर्ण करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे जेणेकरून या ट्रॅकवर नेहमीप्रमाणे गाड्या धावू शकतील.
अश्विनी वैष्णव शुक्रवारी रात्रीपासून बालासोरमध्ये परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि बचाव कार्यात मदत करत आहेत. आमचा पूर्ण फोकस बचाव आणि मदत कार्यावर लक्ष केंद्रीत करणे हा आहे असे वैष्णव यांनी सांगितले. या घटनेची सविस्तर उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तही स्वतंत्र चौकशी करतील, असेही ते म्हणाले.
दरम्यान, दक्षिण पूर्व रेल्वे (SER) रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यासाठी रविवारी हावडा ते बालासोर आणि परत हावडा या दोन मेमू विशेष गाड्या चालवणार आहेत. एक ट्रेन हावडाहून सकाळी 10.30 वाजता सुटेल तर दुसरी ट्रेन हावडाहून दुपारी 01.00 वाजता सुटेल. एसईआरच्या विधानानुसार या गाड्या हावडा आणि बालासोर दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील.
बालासोर ट्रेन दुर्घटनेत 288 प्रवासी ठार झाले आहेत आणि 1,100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, ही भारतातील सर्वात भीषण रेल्वे दुर्घटनेपैकी एक आहे.