चाकण एमआयडीसीसाठी सक्तीच्या भूसंपादनास शेतकऱ्याचा तीव्र विरोध.
चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक 5 साठीच्या भूसंपादनास सक्ती केल्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार सुरु केला आहे. याबाबत शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या नोटिसींची होळी करून शासनाच्या या धोरणाचा तीव्र निषेध काल (दि. 3) चाकण येथे करण्यात आला.
ही बाब अजिबात खपवून घेतली जाणार नाही. सक्तीने जमिनीचा ताबा घ्यायचा असेल त्यावेळी आमच्या छाताडावर गोळ्या घाला आणि मग तुमचा ताबा घ्या अशा तीव्र भावना शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त करत शासनाने याबाबत शेतकऱ्यांना दिलेल्या नोटिसींची होळी करून शासनाच्या धोरणाचा जोरदार निषेध करण्यात आला.
चाकणमध्ये जमलेल्या शेतकर्यांनी सांगितले की, सन 2002 रोजी विमानतळ होणार म्हणून आयताकृती संपादन करण्यात आले. तेव्हा विमानतळाची धावपट्टी आणि विमानतळ करण्यासाठी म्हणून हे शिक्के टाकण्यात आले होते. परंतु सन 2017 रोजी शासनाने लॉजिस्टिक पार्क करायचा असे सांगून विमानतळाचे जे संपादन होते त्यातील काही गट वशिलेबाजी करून सोडले. आता ज्या शेतकऱ्यांच्या खरोखर बागायत शेती आहे, ज्यांना खरोखर शेतीच करायची त्यांची संपादनात संमती नाही अशा शेतकऱ्यांवर शासन सक्ती लादत आहे.
यावेळी शेतकरी नेते जयप्रकाश परदेशी, कॉंग्रेसचे निलेश कड पाटील, राष्ट्रवादीचे राम गोरे, मुबीन काझी, भरत पवळे, अनिल देशमुख, भरत गोरे, दत्ता गोरे, मंदार परदेशी, अमोल जाधव, सचिन पडवळ, दशरथ काचोळे, नवनाथ चौधरी, दिलीप डोंगरे, सागर काचोळे आदींसह बाधित गावातील शेतकरी उपस्थित होते.
एम आय डी सी ने फक्त गुंतवणूक आणावी बाकी संपादन करणे सोडावे, कारण पुणे प्रदेश महानगर यांना पण जरा काम करू द्या . कायम 17 विभाग व्यस्त करून काम बिघडू नये आता शेतकरी हुशार आहेत ते सरकारच्या फसव्या धोरणाला भुलणार नाही. त्यांना एकदाच नुकसान भरपाई घेऊन करोडपती व्हायचे नाही. तर कायम स्वरूपी उत्पन्न त्यांना हवे आहेत असे जिल्हा काँग्रेस प्रवक्ता ॲड.निलेश शंकर कड पाटील यांनी स्पष्ट केले आहे.