प्लंबरचा बांधकाम साईटवरून पडून दुर्दैवी मृत्यू…सुरक्षेच्या उपायांची कमतरता
बांधकाम साईटवरून पडलेल्या प्लंबरचा मृत्यू हा बांधकाम साईटवर आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने झाला आहे.
11 मे रोजी दुपारी बारा वाजता बावधन खुर्द येथील रुना ओ 2 या बांधकाम साईटवर ही घटना घडली.
सुर्यकांत पर्वती साठे (वय 51, रा. भूगाव, ता. मुळशी) असे मृत्यू झालेल्या प्लंबरचे नाव आहे. याप्रकरणी विकास सुर्यकांत साठे (वय 28) यांनी शनिवारी (दि. 3) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाजीराव भीमराव बंडगर (वय 30, रा. कोथरूड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकास यांचे वडील सुर्यकांत साठे हे 11 मे रोजी बावधन कुर्द येथील रुना ओ 2 या बांधकाम साईटवर प्लंबिंगचे काम करत होते.
बांधकाम साईटवर असलेले इंजिनिअर आरोपी बाजीराव बंडगर यांनी बांधकाम साईटवर काम चालू असताना कामगारांच्या सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत.
कामगारांना सुरक्षेचे साहित्य वापरण्यास दिले नाही. दरम्यान, काम करत असताना फिर्यादी यांचे वडील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.