Weather Alert: मुंबई, ठाण्यासह १२ जिल्ह्यांना IMD कडून पावसाचा इशारा
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढच्या ३-४ तासांत तुफान पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिला आहे.
मुंबई व उपनगरे, ठाणे आणि पालघरमध्ये रिमझिम पाऊस होऊ शकतो. तर धुळे, नंदुरबार, नाशिक जळगाव, औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. यावेळी ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील तर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तण्यात आली आहे. येत्या ३ ते ४ तासात नाशिक आणि जळगावमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.
मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये २४ तासांत ढगाळ आकाश असून संध्याकाळी किंवा रात्री हलका रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी कमाल आणि किमान तापमान अनक्रुमे ३४ ते २८ अशं सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात म्यानमार किनाऱ्याजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तर दक्षिण छत्तीसगड आणि तेलंगणा परिसरावरही चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीपासून बिहारपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातही पाहायला मिळत असून यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
जळगांव धुळे येथे जोरदार पाऊस
जळगावात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर दाणादाण उडाली. अचानकच्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाला. वादळी वाऱ्याबरोबर विजांचाही कडकडाट होत असल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपूर्वी तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. मात्र, सकाळी उन्हाचे चटके लागत होते आणि दुपारी अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. तर काही ठिकाणी पाऊसही सुरू आहे.
धुळे शहरात आज सकाळी (रविवारी) जोरदार पावसाने हजेरी लावली. धुळे शहरातील काही भागात गारादेखील पडल्या. दरम्यान, गेल्या आठवड्याभरापासून दिवसभर उन्हाचा तडाखाही वाढला होता. त्यामुळे वातावरणात गारवा तयार झाला होता. हा पाऊस नुकसानकारक असला तरी खरिपासाठी योग्य असल्याची चर्चा शेतकरी वर्गामध्ये सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री तालुक्यांतील काही भागांत गारांसह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे टोमॅटो आणि अन्य पिकांनाही फटका बसणार आहे. अनेक जणांच्या शेतात कांदा काढून ठेवला असून, तो देखील सडण्याची शक्यता आहे.