चित्रकारांच्या सुंदर कलाकृतीने स्मृतीरंग ७५ (पुष्प ३०)प्रदर्शनाची उत्साहात सांगता
संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती चित्रहस्त शिल्पकला विधा यांच्या वतीने स्मृतीरंग ७५ (पुष्प ३०)
प्रदर्शनाची सांगता नुकतीच (दिनांक १६ मे) झाली.
या अंतिम पुष्पाच उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार, कलाध्यापक श्री. दगडू गोटके आणि प्रमुख पाहुणे लायन्स श्री.अनिल भांगडिया (अध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ पुणे, आकुर्डी व लायन्स श्री. वसंतकुमार गुजर (कॅबिनेट ऑफिसर, Dist 3234 D2) यांच्या शुभ हस्ते झाले. पिंपरी चिंचवड परिसरातील ५ कलाकारांनी साकारलेल्या सुंदर कलाकृती या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या.
ज्येष्ठ चित्रकार,कलाध्यापक श्री.दगडू गोटके यांनी मनोगतात सांगितले की कलेला मिळणारा राजाश्रय दिवसेंदिवस कमी होत असला तरी संस्कार भारती व पी. एन. गाडगीळ ॲन्ड सन्स यांसारख्या कलारसिक संस्था पाठीशी उभ्या राहतात हे खूपच आश्वासक आहे. सहभागी चित्रकारांना मार्गदर्शन करताना चित्रकलेतील बारकावे, सातत्य आणि साधनेचे महत्व सांगितले. कलाकारांनी साकारलेल्या सुंदर कलाकृतीसाठी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
लायन्स श्री. अनिल भांगडिया (अध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ पुणे, आकुर्डी ) यांनी प्रदर्शनातील कलाकारांची आणि त्यांच्या कलाकृतींची प्रशंसा केली. संस्कार भारती आणि लायन्स क्लब एकत्र येऊन कलेच्या क्षेत्रात मोठे काम करू शकतील आणि त्यादृष्टीने आपण मिळून प्रयत्न करु असे प्रतिपादन केले. पिंपरी चिंचवड महानगरात कलादालन नाही तेव्हा लायन्स क्लबच्या माध्यमातून कलाकृती रसिकां पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करु असे सुचविले.
तसेच लायन्स श्री. वसंतकुमार गुजर (कॅबिनेट ऑफिसर, Dist 3234 D2) स्मृतिरंग ७५ या अनोख्या प्रदर्शनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणे हा अतिशय आनंदाचे क्षण असल्याचे सांगितले. लायन्स क्लबच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देत कलेच्या क्षेत्रात ही अशाच प्रकारचे काम करायला आवडेल असे सांगितले.
सहभागी कलाकार कोमल देशमाने,राजकमल प्रभू, प्राची वर्मा ,पल्लवी जाधव ,गौरी रायकर यांना उद्घाटक व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी विशेष उपस्थित चित्रकार श्री. खिलचंद चौधरी आणि समाजसेवक श्री. काशीकर यांचा ही सन्मान करण्यात आला.
सचिव सौ.लीना आढाव यांनी संस्कार भारतीच्या कार्याबद्दल व त्यामधील दृष्यकला विभागाच्या आगामी उपक्रमाबद्दल माहिती दिली.
कला साधक श्री.भाग्येश अवधानी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.संस्कार भारती सदस्य श्री आनंद यंकरस यांनी आभार मानले.
या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी समिती सचिव सौ. लीना आढाव, उपाध्यक्ष श्री. प्रफुल्ल् भिष्णूरकर, चित्र-शिल्प-हस्त कला विधा संयोजक श्री. धीरज दीक्षित आणि सहसंयोजक श्री रमेश खडबडे यांनी विशेष परिश्रम घेतले.