ओडिशा :’शवागारात सापडला जिवंत मुलगा’- वडिलांच्या अथक प्रयत्नांना मिळालं यश,ओडिसा रेल्वे अपघातचा हृदयद्रावक थरार.
ओडिसाच्या बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात जखमी किंवा मृत झालेल्या आपल्या नातलगांचा शोध घेताना समोर येणाऱ्या काही घटना अतिशय हृदयद्रावक आहेत.आपला मुलगा अपघातानंतर जिवंत आहे समजले तरी आपल्या मुलाला शोधण्यासाठी वडिलांना चक्क शवागरही पहावे लागले.
हावडाचे एक दुकानदार हेलाराम मलिक यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे.
कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात झाला त्यादिवशी हेलाराम यांनी मुलगा विश्वजीत याला शालीमार स्थानकात गाडीत बसविले. त्यानंतर गाडीचा अपघात झाल्याची ती वाईट बातमी धडकली.त्यानंतर मुलाला फोन केला तर त्याची खुशाली कळली पण जखमा भरपूर असल्याने तो बोलण्याच्या स्थितीत नव्हता.
आपला मुलगा जिवंत आहे या बातमीने हेलाराम यांनी एका क्षणाचाही विलंब न करता एका स्थानिक एम्ब्युलन्स ड्रायव्हरला सोबत घेऊन हेलाराम यांचा मेहुणा दीपक दास बरोबर त्याच रात्री प्रवास सुरु केला. त्याच रात्री 230 किमीचा प्रवास करीत हेलाराम बालासोरला पोहचले. परंतू सर्व हॉस्पिटल्स शोधूनही मुलगा विश्वजीत काही सापडला नाही.
हेलारामचे मेहुणे दीपक दास यांनी सांगितले की आम्ही हिंमत हरली नाही. आम्ही लोकांकडे चौकशी करीत राहिलो. अशातच एका व्यक्तीने सल्ला दिला की जर मुलगा हॉस्पिटलमध्ये सापडत नाही तर शवागरात एकदा चौकशी करावी,काळजावर दगड ठेवून तेथे निघाल्याचे दास यांनी सांगितले.हेलाराम मलिक यांना स्वत: जाऊन मृतदेहांची ओळख पटविण्याची परवानगी दिली नाही. परंतू काही वेळाने तेथे जेव्हा कोणी तरी एका व्यक्तीचा उजवा हात हलताना दिसला असे सांगत आले ,तेव्हा गोंधळ उडाला. तेव्हा मलिक तेथेच होते. त्यांनी पाहिले की तो विश्वजीतच होता. बेशुध्द व जखमी अवस्थेत असलेल्या आपल्या मुलाला त्यांनी एम्ब्युलन्सने बालासोरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले.तेथे काही इंजेक्शन्स दिली गेली. परंतु त्याची नाजूक स्थिती पाहून डॉक्टरांनी कटक येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले, बॉंडवर सही करून डिस्चार्ज घेतला व त्यानंतर विश्वजीतवर कोलकाता येथील रुग्णालयात सर्जरी केली गेली.आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.