शाळांचा गुणवत्ता स्तर उंचावण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची-आयुक्त सिंह
महापालिका शाळांमध्ये शिकल्याचा विद्यार्थ्यांना अभिमान वाटेल असे दर्जेदार आणि गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे. शिक्षकांच्या अशा कामामुळे महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या निश्चितपणे रांगा लागतील
असा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांकरिता संवाद कार्यशाळेचे आयोजन आज (गुरुवार) रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहा मध्ये करण्यात आले होते. यावेळी महापालिकेचे आयुक्त सिंह यांनी शिक्षकांसोबत संवाद साधला. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे,सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, विशेष अधिकारी किरण गायकवाड,सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान, रोहिणी शिंदे यांच्यासह महापालिका शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
महापालिका शाळा, रुग्णालये, उद्यानांसारख्या ठिकाणी दर्जेदार सुविधा दिल्यास नागरिकांचा महापालिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत असतो. प्रशासनाच्या वतीने महापालिका शाळांना विविध सेवा सुविधा पुरवल्या जातात. मात्र शाळांचा गुणवत्ता स्तर उंचावण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थी हा केंद्रबिंदू समजून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव दिला पाहिजे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना आधुनिक जगाची ओळख करून देण्याबरोबरच अभ्सासक्रमासोबत विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य, व्यक्तीमत्त्व विकास यावरही शिक्षकांनी भर दिला पाहिजे, असे आयुक्त सिंह म्हणाले.
ब्लॉकबस्टर चित्रपटाशी तुलना करत सिंह यांनी शिक्षकांना त्यांच्या जबाबदार भूमिकेची जाणीव निर्माण करून दिली. ते म्हणाले, शिक्षकाची भूमिका चित्रपटाच्या दिग्दर्शका सारखी असते. उच्च ध्येय बाळगून जीवनात यशस्वी होणारे विद्यार्थी अशा यशस्वी चित्रपटाचे खऱ्या अर्थाने नायक असतात. विद्यार्थ्यांचे आयुष्य यशस्वी करण्यासाठी दिग्दर्शकरुपी शिक्षकांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले पाहिजे.
क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियातर्फे शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. शिक्षकांचा आत्मविश्वास वाढावा, त्यातून महापालिका शाळांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे, शाळेची गुणवत्ता वाढावी यासाठी संवाद कार्यशाळा महत्त्वपुर्ण ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बालवयात मुलांमध्ये असणारे शारिरीक दोष वेळीच लक्षात आल्यानंतर त्यावर वेळेत उपचार करणे सहज शक्य आहे.