यंदाची वारी होणार आरोग्य वारी- थं क्रिएटीव्ह’ सामाजिक संस्थेचा पुढाकार
विठ्ठलाच्या जयघोषात निघणारी आषाढी एकादशी निमित्तची पंढरपूर वारी ही वारकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणीच असते. वारीचे महत्व दिवसेंदिवस वाढते आहे.वारीतील या वाढत्या संख्येमुळे स्वच्छता विषयक अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावर उपाय म्हणून यंदा प्रथमच आरोग्यपूरक आणि पर्यावरण पूरक वारीचे नियोजन करण्यात आले आहे.यासाठी ‘थं क्रिएटीव्ह’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्लॅस्टिक,थर्माकोल, कचरामुक्त दिंडी अभियान २०२३ राबविण्यात येणार असल्याची माहिती निसर्गवारी अभियानाचे प्रमुख प्रशांत अवचट यांनी दिली.
वारीकाळात वारकऱ्यांना देण्यात येणारे भोजन प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या पत्रावळीतून दिले जाते. त्यातून आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. पर्यावरणपूरक पत्रावळीतून भोजन देऊन पर्यावरण संरक्षण आणि आरोग्याचे जतन करण्यासाठी ‘थं क्रिएटीव्ह’ संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यातून समाजाच्या हितासाठी पर्यावरण संरक्षण,निसर्ग संवर्धन, पाणी बचत, वारकऱ्यांचे आरोग्य, पत्रावळी वाटप ते संकलन रचना, कचरा मुक्ती सहज शक्य होणार असल्याचा विश्वास अवचट यांनी व्यक्त केला. संपूर्ण वारी मार्गावर अशा स्वरूपाच्या पत्रावळींचा वापर करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आळंदी, देहू येथील नोंदणीकृत दिंडींचे चालक, व्यवस्थापक आणि स्थानिक संस्थांशी संपर्क करून या अभियानासाठी प्रबोधनपर कार्यक्रमही घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
वारकरी, अत्रदाते यांच्यामध्ये जनजागृती करून
द्रोण,पत्रावळीची उपलब्धता वाढवण्यासाठी दानशूर मंडळी, विक्रेते यांचा समन्वय साधला जात आहे.
या अभियानाचा फायदा म्हणजे वापरलेल्या पत्रावळींचे संकलन करून त्याचे सेंद्रिय कंपोस्ट खत तयार करता येणार असून ते खत शेतकऱ्यांना मोफत वितरण करण्यात येईल.
माउलींच्या पालखीमधील सर्व दिंड्यांना येत्या १५ जूनला आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दिंड्यांना १६ जून रोजी संस्थेच्या वतीने या पत्रावळींचे वाटप करण्यात येणार आहे. या अभियानात नागरिकांनाही सहभागाची संधी आहे.
ज्या नागरिकांना वारी काळात सेवा द्यायची किंवा अन्नदान करायची इच्छा आहे त्यासाठी संस्थेने पेमेंट गेट वे सुरू केले आहे. त्याद्वारे नागरिकांना पत्रावळ दान करून अभियानात सहभागी होता येणार आहे.अंदाजे ५०० जणांचे अन्नदान असल्यास तितक्या पत्रावळी दान करता येणार आहेत.
सामान्य नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सामाजिक कार्यास हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे.