‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची निर्मिती-वाकड,भूमकर चौक, पुनावळे, देहूरोडमधील वाहतूक कोंडीवर उपाय
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड येथील सेंट्रल चौक आणि मुंबई-बंगळुरु महामार्गा वरील वाकड, भूमकर चौक, पुनावळे, ताथवडेतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून किवळे जंक्शन ते बालेवाडी स्टेडिअम पर्यंत 8.6 किलोमीटर अंतरावर ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याबाबतचा डीपीआर तयार असून यासाठी आवश्यक जागेचे महापालिकेने तातडीने भूसंपादन करण्याची सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जाणा-या मुंबई-बंगळुरु महामार्गावरील वाकड, भूमकर चौकातील आणि देहूरोड येथील वाहतूक कोंडी सोडविणे आणि भविष्यकालीन नियोजना बाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्यामार्फत महापालिकेत सादरीकरण करण्यात आले.
यावेळी आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रेरणा शिनकर, उपव्यवस्थापक अंकित यादव, सल्लागार भरत तोडकरी, ऋषीकेश कुमार आदी उपस्थित होते.