त्या 83 जणांमुळे 55 हजार परीक्षार्थी ‘वेटींगवर’!
मे महिन्यामध्ये तीन दिवस पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील 15 पदांच्या 388 जागांसाठी ऑनलाइन पध्दतीने राज्यातील विविध केंद्रांवर परीक्षा पार पडली.
या परीक्षेसाठी 55 हजार 82 जणांनी परीक्षा दिली आहे.पालिकेच्या विविध जागांसाठी अर्ज आले त्यामधे युपीएससीचेही उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी होते.
महापालिकेची सरळ सेवेने भरती असल्यामुळे राज्यभरातून अर्ज आले.
महापालिकेच्या परीक्षा कालावधीमध्ये म्हणजे युपीएससीची (दि.28) मे रोजी परीक्षा आली होती. त्यामुळे पालिकेच्या परीक्षेपूर्वीच 366 विद्यार्थ्यांनी
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे दुसऱ्या दिवशी परीक्षा घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार पालिकेने 366 पैकी 283 जणांची (दि.27) मे रोजी परीक्षा घेतली.मात्र, उर्वरित 83 जणांची परीक्षा घेणे शक्य झाले नाही. या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा लवकरात-लवकर घेतली जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले होते. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारीही केली.
युपीएससीची परीक्षा देणाऱ्या 83 जणांची परीक्षा आता थेट पुढील महिन्यात घेण्यात येणार आहे. त्या 83 जणांमुळे 55 हजार परीक्षार्थींचा निकाल वेटींगवर आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची परीक्षा राज्यातील 26 शहरातील 98 केंद्रांवर टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) माध्यमातून दि. 26, 27 व 28 मे ला झाली. या परीक्षेसाठी 85 हजार 387 जणांनी अर्ज केले होते. मात्र, प्रत्यक्षात 64.19 टक्के म्हणजेच 55 हजार 82 जणांनी परीक्षा दिली आहे. 30 हजार 305 जणांनी परीक्षाच दिली नाही. त्यामुळे महापालिका नोकरीसाठी काही अंशी स्पर्धा कमी झाली आहे. सहाय्यक उद्यान अधिक्षक पदाचे आरक्षण रद्द झाल्याने या पदाची परीक्षा घेण्यात आली नाही. त्यामुळे या पदासाठी अर्ज केलेल्या 89 जणांना त्यांचे प्रवेश शुल्क परत देण्याचा पालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीने प्रश्न पत्रिका तयार करण्यास दीड ते पावणे दोन महिने लागतील, असे सांगितले. त्यामुळे या 83 जणांची परीक्षा लांबणीवर गेली आहे. मात्र, 83 जणांमुळे 55 हजार 82 परीक्षार्थींचा निकाल लांबणीवर गेला आहे. त्यामुळे महापालिकेने टीसीएस कंपनीशी बोलणी करून तत्काळ 83 विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन निकाल जाहीर करावा, अशी मागणी परिक्षार्थींकडून करण्यात येत आहे.