मोरेवस्ती, चिखली: व्यावसायिकाने हप्ता देण्यास नकार दिल्याने दुकानाची तोडफोड
मोरेवस्ती, चिखली येथे एका व्यावसायिकाकडे 500 रुपये हप्ता मागितला व तो देण्यास नकार दिल्याने दुकानाची तोडफोड केली. तसेच दुकानातून रोख रक्कम आणि मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 9) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास घडली.
आकाश नडविन्मणी (रा. मोरेवस्ती, चिखली), सुमिर उर्फ सुम्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), ईश्वर कांबळे (रा. मोरेवस्ती, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अब्दुल रहेमान मलिक शेख (वय 38, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मोरेवस्ती येथे मुस्कान जेन्ट्स पार्लर नावाचे केशकर्तनालय चालवतात. ते शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजता दुकानात असताना ईश्वर कांबळे याने फिर्यादी शेख यांना दुकानाच्या बाहेर बोलावले. त्यांना 500 रुपये हप्ता मागितला. शेख यांनी हप्ता देण्यास नकार दिला असता त्या रागातून आकाश आणि सुमित या दोघांनी बिअरच्या बाटल्या दुकानात फेकून दुकानातील आरसे फोडले.
तिन्ही आरोपींनी दुकानात घुसून खुर्च्या व सामानाची तोडफोड केली. दुकानातील कामगारांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. दुकानातील गल्ल्यातून 6 हजार रुपये रोख रक्कम आणि 20 हजारांचा मोबाईल फोन आरोपींनी जबरदस्तीने चोरून नेला. जाताना आरोपींनी ‘तू पोलिसात तक्रार दिली तर जीवे मारीन’ अशी शेख यांना धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.