IAS: पिंपरी चिंचवड शिरपेचात मानाचा तुरा…सनदी अधिकारी संकेत भोंडवे यांची संयुक्त सचिव पदावर पदोन्नती
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे खासगी सचिव आयएएस संकेत भोंडवे यांची संयुक्त सचिव पदावर पदोन्नती झाली. पिंपरी-चिंचवड शहराचे सुपुत्र असलेले भोंडवे यांना सहा राष्ट्रीय आणि दहा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी उद्यान अधीक्षक दिवंगत शांताराम भोंडवे यांचे ते सुपुत्र आहेत.
2007 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या संकेत भोंडवे यांना मध्यप्रदेश केडर मिळाले. मध्यप्रदेशच्या विविध जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे. प्रतिभाशाली अधिकारी म्हणून असलेली त्यांची ओळख आहे.एक दशकाहून जास्त काळ त्यांनी आपल्या कामाचा ठसा देशभर उमटविला आहे. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी त्यांनी आपल्या अनेक व्याख्यानांमधून मार्गदर्शन केले आहे.
आयएएसची पाऊलवाट भारतीय प्रशासकीय सेवेचा एक दशकाचा प्रवास या पुस्तकाची दहावी आवृत्तीही प्रकाशित झालेली आहे.
तरुणांना प्रेरणादायी असा त्यांचा प्रवास आहे, सध्या संकेत भोंडवे केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली येथे मंत्री नितीन गडकरी यांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांची खासगी सचिव पदावरून संयुक्त सचिव पदावर नुकतीच पदोन्नती झाली आहे.