जी-२० सदस्यांचा वारी सोहळ्यात सहभाग.’याची देही याची डोळा’ अनुभवली वारी (काही खास क्षणचित्रे)
पुणे : ‘जी-२०’ परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींनी सोमवारी पुण्यात पालखी सोहळ्यात सहभागी होत ‘वैष्णवांचा आनंदसोहळा’ अनुभवला. दिंड्या-पताका घेऊन टाळ-मृदुंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष करीत लाखोंच्या संख्येने चालणारे शिस्तबद्ध वारकरी पाहून परदेशी पाहुणे विस्मयचकित झाले होते. पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेली वारी परदेशी पाहुण्यांनी आपल्या मोबाइलमध्ये चित्रीकरणाच्या स्वरूपात जपूनही ठेवली.
जी-२०’ परिषदेची ‘डिजिटल इकॉनॉमी’ विषयावरील कार्यकारी गटाची बैठक पुण्यात होत आहे. जगातील प्रमुख वीस आर्थिक महासत्तांच्या प्रतिनिधींचा त्यात समावेश आहे. त्यांनी वारीतून महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अनुभवली.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रतिनिधींचे स्वागत केले. महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस आयुक्त रितेशकुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक आदी या वेळी उपस्थित होते.
ढोल-ताशांच्या गजरात तुळशीमाळा, उपरणे व गांधीटोपी घालून या प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर वारकऱ्यांनी प्रतिनिधींना टिळा लावला. काही प्रतिनिधींनी उत्साहाने वारकऱ्यांसोबत फुगड्यांवर फेर धरला, तर काही प्रतिनिधींना ढोल-ताशाच्या तालावर नृत्य करण्याचा मोह आवरला नाही. पालकमंत्र्यांसोबत परदेशी प्रतिनिधींनी पालख्यांचे दर्शन घेतले. पुणे महापालिकेतर्फे नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ‘जी-२०’च्या प्रतिनिधींना पालखी सोहळा पाहण्यासाठी मंडप उभारण्यात आला होता.