NEET UG 2023 चा निकाल जाहीर- बहुतेक यशस्वी उमेदवार उत्तर प्रदेशामधील
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी NEET UG 2023 चा निकाल जाहीर केला आहे. तामिळनाडूतील प्रबंजन जे आणि आंध्र प्रदेशातील बोरा वरुण चक्रवर्ती यांनी NEET परीक्षेत 99.99 टक्के गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून सांगण्यात आले की बहुतेक यशस्वी उमेदवार उत्तर प्रदेशातील आहेत. त्यानंतर महाराष्ट्र आणि राजस्थानचा क्रमांक लागतो.
महाराष्ट्रात श्रीनिकेत रवीने पहिला क्रमांक पटकावला तर आर्या पाटील, हादी सोलकर यांनी अपंग प्रवर्गातील, पलक शहाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील, आयुष रामटेकेने अनुसूचित जाती प्रवर्गातील, शिवम पाटील इतर मागास वर्ग प्रवर्गातील पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील पात्रताधारक जवळपास पन्नास हजारांनी वाढले आहेत.
एकूण 20.38 लाख उमेदवारांपैकी 11.45 लाख उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक 1.39 लाख उमेदवार यशस्वी झाले आहेत. यानंतर महाराष्ट्रातून 1.31 लाख आणि राजस्थानमधून 1 लाखाहून अधिक उमेदवार यशस्वी झाले आहेत.