महाराष्ट्र राज्य:जनावरांच्या वाहतूकी संदर्भातील नियमांचे पालन करा अन्यथा कठोर कारवाई,बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कडक नियम
जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक असल्याचे पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, त्या अनुषंगाने परिवहन विभागाकडून वाहतूकदारांना दक्षता घेण्याबाबत कळविण्यात आले असल्याचे आदे म्हणाले.
जनावरांच्या वाहतुकी साठी विशेष परवान्यासाठी ऑनलाईन पद्धतीने https://parivahan.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज करुन त्याचे शुल्क या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जमा करावे. त्यानंतर संबंधित वाहनात आवश्यक ते बदल करुन वाहन तपासणीसाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयात कार्यरत मोटार वाहन निरीक्षक यांच्यासमोर सादर करावे.
प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (प्राण्यांची पायी वाहतूक) नियम 2001 च्या नियम 96 मधील तरतुदीनुसार वाहनातून जनावरांची वाहतूक करताना वाहतूकदाराने सक्षम प्राधिकरण, भारतीय प्राणी कल्याण मंडळ व केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकारी वा व्यक्ती वा प्राणी कल्याण संस्था यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सोबत बाळगावे असे प्रमाणपत्र जारी केले नसल्यास जनावरांच्या वाहतूक करण्यास वाहतूकदाराने नकार देणे अपेक्षित आहे. तरतुदींचे पालन न केल्यास संबंधितां विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही अतुल आदे यांनी म्हटले आहे.